Tuesday 27 November 2007

ब्युरोक्रसी

मॅडम नोकरशाही म्हणजे काय?"
नामा ऑफिसला बसल्या बसल्या काही रजिस्टर चाळत होता. नामा असिस्टंट तलाठी म्हणून नुकताच लागला होता. अजून रेव्हेन्यूत त्याच मडकं कच्चं होतं. आणि तलाठ्याकडं जी इतरांपेक्षा ग्रेट 'समजण्याची' कला असते ती त्याच्यात नव्हती. कामात त्याचा व्यत्यय नको म्हणून त्याला आज त्याच्या मुख्य तलाठ्यानं - शेळकेनं नायब तहसिलदार मॅडमपुढे बसवला होता. पण मॅडमला फोनवर गप्पा हाणण्यापासून फुरसतच नव्हती. अडलेला शब्द विचारण्यासाठी मघापासून तो बाईसाहेबांसमोर उभा होता.

फोन ठेवल्याबरोबर सवयीने मॅडम ओरडल्या, "आधी भायेर व्हा मग बोला...!"
"आता..! भायेरनं कसं काय बोलायचं?" नामा चाचरत म्हणाला.
बाजूच्या टेबलवरचा दळे मध्ये पडला, "मॅडम तो नवा तलाठी हे! आजच्याला इथेच थांबणारे..."

नामा नवीन नोकरीला लागलेला असल्याने उत्साह 'दाखवण्यासाठी' नवे नवे प्रश्न शोधत होता. दळेची अवस्था 'दळे काही न कळे' अशी होती. तोही नामासारखाच 'चुकून' रेव्हेन्यूत राहिलेला. मंत्री येणार त्या दिवशी साडी कोणती नेसावी या चिंतेत असलेल्या मॅडम, नामाने 'नोकरशाही म्हणजे काय?' म्हटल्यावर दळेकडे पाहून मनमोकळं हसत म्हणाल्या, "नामा, नोकरशाही म्हणजे सरकारचे व्याही, जेथे सगळे नोकर स्वत:ला शाही समजतात! कळलं?"

दळेने त्यावर नामाला "दे टाळी" म्हणले. नामाच्या सगळं डोक्यावरुन जात होतं. ‘च्यायला इथे कुणीच सरळ उत्तर देत नाही. काय तमाशा आहे.’ तो मनात म्हणाला. मॅडम परत आपल्या फोनवर बिझी झाल्या.

आज सकाळी सकाळी नाम्यावर परिणाम करणारी एक घटना घडली होती. ऑफिसला येण्यासाठी गावाच्या बस थांब्यावर नामा उभा होता. 'कालीपिली' भरली जात होती. कॉलेजात जाणार्‍या पोरंपोरींना कालीपिलीचा ड्रायव्हर आत ढकलत होता. मधल्या सिटवर सगळ्या पोरी भरून झाल्या, पण एक बाई मागं राहिली तशी 'आजून शिट शिल्लक हाये, या की आत, लयी जागा हे' म्हणत मधल्या शिटावरल्या पोरींना सरका सरका करत सरकवू लागला. आणि तीन जणींच्या जागी पाच जणी बसलेल्या पोरी अजून सरकू लागल्या. पलिकडं गाडीच्या दाराजवळ इंद्रा बसलेली होती. तिने एक उसळी मारुन सरकायचा प्रयत्न केला, तसे कालीपिलीचे दार उघडून ती धापदिशी डायरेक्ट नामावर जाऊन आदळली.

ड्रायव्हर पोर्‍यावर ओरडू लागला, "तरी म्हनलं होतं तुले की दोरी पक्की बांधजो फाटकले, पन तूबी नं! कंची शाळा शिकला रे? सकायपास्न तीन वार पॅशेंजर पडलं...!"

नामा आणि इंद्रा अंगावरची धूळ झटकत उभे राहिले. आणि प्रेमात पडले.

नामाने लागोलाग त्याचा एक खास मित्र गाठला, जो चोवीस तासांपैकी सोळा तास थांब्यावरच्या टपरीवर घोटाळत असायचा आणि त्याच्याकडनं इंद्राची सगळी माहिती गोळा करुनच आज नामा ऑफिसला आला होता. त्याच्या डोक्यात इंद्रा घोळत होती. ती पण शेळके भाऊसाहेबाची मुलगी! काय योगायोग बघा...! मग काय आपल्या भाऊसाहेबाला खुष करायचे सगळे प्रयत्न नामा करणार होता. पण सध्या इतक्या टेन्शनमध्ये त्यांना फक्त इम्प्रेस करत रहायचे एवढेच त्याने ठरवले होते.

दारात एक आजीबाई गडबड करीत होत्या. मॅडमने 'बघ' म्हणताच नामा भानावर आला. त्याच्याही अंगात जरा पॉवर आली.

"काये गा म्हतारे?"
"ओ बाबा, म्या सरोसोती, माजी म्हस मेली रातच्याला. तिचं पैसं इथे ही बया वाटती म्हून घ्याया आले. दरडावतो कशापायी."
नामा वरमून म्हणाला, "सरस्वती बाई असं नाय बोलाचं. मॅडम म्हणायच आसतं."
"सरसोती मॅडम ..म्हनलं! बोलू आता फुडं? एवढा गोठा भरुन कडबा घीन ठेवला तो कुणापुढं घालू आता? तुह्यापुढं की या बाईपुढं?" म्हातारीचं बोलणं ऐकून नामाची जिभच टाळूला चिकटली.

तेवढ्यात मॅडम ओरडल्या, "साहेब आले.साहेब आले. चला व्हा बाजूला."
दारात रावसाहेबांची गाडी येऊन थांबली. तहसिलदारांच्या गाडीतूनच 'प्रांत'ही उतरत होते (आज पुन्हा त्यांची गाडी त्यांच्या बायकोने नेली असावी.)

साहेब आता रोजच फेर्‍या करत होते. वनमंत्री भेट देणार होते. दप्तर नीट लावायची गरज नव्हती, ते काही ऑफिसला भेट देणार नव्हते. गावात फेमस मंदिर होते महादेवाचे, तिथं अभिषेक घालायचा होता त्यांना, तेही सपत्निक!

मागच्या मंत्र्याच्या टायमाला तलाठयांनी खूप गोंधळ घातला होता. खरंतर गोंधळ सगळ्यांनीच घातला होता, नाव तलाठ्याचं आलं होतं. (हल्लीच हे मंदिर भेटी द्यायला मंत्र्यांच्या बायकांत फेमस झाले होते. तसा इकडे लाल दिव्याच्या गाड्यांचा ओघ वाढला होता.) त्यामुळे या वेळी सगळे साहेब सजग होते. शेळके तिथला तलाठी होता आणि नामा त्याचा असिस्टंट.

आल्या आल्या प्रांतसाहेबांनी तहसिलदार, क्लार्क, तलाठी सगळ्यांना धुवायला सुरुवात केली. साहेब का धुताहेत हे विचारण्याची पद्धत रेव्हेन्यूत नाही. 'वरच्यांनी आपल्याला धुतले की ते गेल्यावर आपल्या खालच्याला आपण धुवायचे' एवढंच सूत्र असतं. हे माहित नसलेला नामा त्यामुळं बावचळून गेला होता. इतरांच्या हे सवयीचे झाल्याने ते बिनधास्त असते, पण मागच्या मंत्र्याच्या टायमाला एक तलाठी निलंबित झाला होता, तहसिलदार, प्रांतांना नोटीसा निघाल्या होत्या. सगळे अचानक आतून हलल्यासारखे उभे होते.

प्रांत कडाडले, " या.. या... या वेळेला तरी तयारी नीट झाली ना? की नुसतं 'हो, हो, हो झालं' सगळं? आयत्या वेळला गायी म्हशी मागं पाट्या धरून धरून फिरावं लागलं होतं. त्यामुळं एक तलाठी...."

"विलंबित झाला होता..." प्रांताचं वाक्य शेळकेनं पूर्ण केलं.

"विलंबित नाही निलंबित. पूर्ण सूचना सुद्धा ऐकत नाही. धावता आपले पुढं. शेळके चांगला नाचत नाचत आला होता ना तू रे.. मला हेच गाव पायजेल, पोरीचं इथेच जुळवायचंय म्हणून. या गावाला काम पण कराव लागतंय. समजलं का? सालं xxxxxxx. तलाठ्याला सारं जग महसूल यंत्रणेचा डोळा समजतं. समजतं का नाही?"

यावर सगळ्या तलाठ्यांचा उर अभिमानानं भरुन आला, शेळके जरा रीलॅक्स होऊन हसला.

"पण च्यायला, कुणाले हे माहित नाही की या डोळ्यात ‘फूल’ पडलेलं असतं" प्रांताच्या या वाक्यावर शेळके तोंडात मारल्यासारखे 'कुठून हसलो' विचार करत गप्प बसला. शेळकेसारख्या 'वाघ' तलाठ्याची शेळी झालेली बघताच नामाला उद्या तर अजून मोठ्ठे साहेब येणारेत तेव्हा काय व्हायचं याचं संकट पडलं.

'आपल्या ऑफिसाकडं चल' अशी खूण करताच शेळकेमागून नामा गपचुप चालू लागला. आपल्या ऑफिसबाहेर शेणाच्या थप्प्या येऊन पडलेल्या बघून नामाचा ‘आ’ वासलेलाच राहिला. बाहेर कोतवाल आणि दोन लोक डोक्यावर तगार्‍या घेऊन उभे होते. "येवढं गावलं बगा भाऊसाहेब! आजून आणाया निघालोत आता. काल तर रातच्याला आमी गोठ्या फुढंच झोपलोत. त्यो वास आजून नाकात नी डोक्यात घुसलाय. रातभर आशी पाळतच ठिऊन हुतो. येका म्हतारीची म्हस मेली तर ती लागली ना वरडाया तुमी नजर लावली म्हुन. भाऊसाहेब, ह्यो दर व्येळी मंत्र्याचा दौरा लयी कठिण जातो बगा."

कोतवालाकडं हळूच सरकत नामाने कोतवालाला विचारले "ह्यो शेणाची काय भानगड हाय?" शेळकेने नामाच्या या वाक्याला ऐकले आणि उखडून म्हणाला, "मंत्र्याच्या तोंडाला फासाचं हाय! त्याच त्वांड काळं करुन पगार वाढावायचाय माला. पोरीचं लगीन कराच म्हुन!"

काळं फासाचं? तेही सरकारी लोकांनी! काय बी काय? नामाला थरकं भरलं. 'आनी म्या काय हुंडा घ्यायाचो नाही', तो मनाशीच म्हणाला.

"आनी त्या आदी त्याना खायाला द्राक्षे आनून ठीव. इथली द्राक्षे फेमस आहेत." शेळकेनी हुकुम सोडला.
'हे बरंय! आधी द्राक्षे द्यायाची आणि मग काळं फासाचं'. नामाला वाटले त्यापेक्षा मंत्री साहेबांच्या बाईसाहेबांना सांगावे पगार वाढौन द्या म्हणून. त्यांचा हट्ट मंत्रीसाहेब टाळायचे नाहीत. त्याशिवाय का इथे पूजेला येतायेत.

कोतवालाला काय भानगड आहे विचारले तर भूत बघितल्यासारखा चेहरा करुन 'काय धाकले भाऊसाहेब, तुमीबी कायबी ईचारता' म्हणू लागला. आता हे शेण आणि इंद्रा यांच्या गोंधळात त्याचे डोके पार कामातून गेले.

दुसर्‍या दिवशी कलेक्टरसाहेबांच्या ऑफिस आणि साईट भेटीला सगळे घशात माशाचा काटा अडकल्यासारखे गुपचुप उभे राहिले.
"आमी काय म्हणते तुमाला S.D.O., ते कॅटल डंग मिळाले ना? आता मीच ते हेलीपॅड बगुन घेते. नीट झाले ना? चला आपन साईट बगुन येऊ की!" मोठ्या साहेबांनी सूचना दिली.

‘घेते?' नामाचा गोंधळ झाला. दळे कानात कुजबुजला, ‘साहेब तिकडचे हायेत ना मद्राशी म्हुन आसं बोलतात.’

प्रांताना त्यांचा मवाळ आवाज ऐकून बरे वाटले. आता त्यांच्याशी बोलायला हरकत नाही वाटून ते म्हणाले, "साहेब दोन दिवस से मैं रोज इथे आकर बघून घेता है, की हेलीपॅड अच्छा हो रहा है ना, वैसे काळजी का कुछ नही. हमने रास्तेपे खडी डालनेको P.W.D को बोल दिया है. वो लोग खड्डा बुझा देंगे. लेकिन वो लोग जरा चढेल है, सुनता नही है. आप अगर थोडा उनको आग्रह करेंगे तो काम जल्दी होगा. आणि वो नारियल, पूजा का सामान.. सब तयारी हो गयी है." प्रांताने पाचवीतल्या मुलाने हिंदीचे पुस्तक वाचावे त्या सुरात एक साथ म्हटले.

शेळकेची पण मग भिड चेपली, "साहेब रातको तो मैं झोपता बी गोठे के सामने. सुबह निकलने के बाद जेवनेको बी घर नही जाता. आप खुदकी आँखोनी बघो की म्हणजे लक्षामदी येईल. सगळे को काम के लिये एक दिन के आड में आने को बोल दिया है, मी ऑफिस में! और मैं दहाबारा बाई भी बुलाके लाया हू, या बारे प्रांत साहेबांनी उसमे खुद डोकं घाला तो बाया भी मान गयी." आवाजात पूर्ण जिलेबी घोळून झाली होती शेळकेची.

नामाचा त्यांच्या प्रत्येक शब्दागणिक गोंधळ अजूनच वाढला होता.

"च्चला, मी बगूनच घेतो नी एकबार." असं म्हणून साहेब उठले. त्यांच्या मागे सगळी पलटण साईटवर निघाली. प्रांत घाईने साहेबांसोबत जाऊन बसले, कारण आजही त्यांची गाडी त्यांच्या बायकोने दळण आणायला पाठवली होती.

साहेबांची गाडी हेलीपॅड बघायला निघाली. त्यामागे तहसिलदार रावसाहेबांची पुढचे दात पडल्यासारखी दिसणारी निळी बाबा आदमच्या जमान्यातली जीप, त्यात कोंबून बसवलेले पाच तलाठी, पाच क्लार्क. तिला तिचा ड्रायव्हर प्रेमाने 'निलांबरी' म्हणायचा. तसं म्हणले की ती लवकर स्टार्ट होते असं त्याला आपले उगाच वाटायचे. पण यावेळी तिने त्याला धोका दिला. गाडी स्टार्टच होईना. सवयीने मागचे सगळे न बोलता उतरले आणि धक्का मारू लागले. गाडीत पुढे लोडाला टेकलेल्या शेठजीसारखे बसलेले रावसाहेब आणि आपल्या बापजाद्याच्या जमान्यापासून सरकारी सेवेत असल्यासारखी मग्रुरी चेहर्‍यावर घेतलेला ड्रायव्हर. मागून हातातल्या हँडबॅग आणि मोबाईल सावरत धक्का मारणारी मंडळी. अशी वरात कंपाऊंडबाहेर पडली नि समोरून रस्ता चुकून कलेक्टर साहेबांची गाडी परत येत होती.

समोरून येणारी ही मोठ्या साहेबांची गाडी मागून ढकलणार्‍यांना कुठची दिसतेय? ते आपले मन लावून ढकलतायत. गाडीतल्या दोन्ही साहेबांचे चिडलेले चेहरे बघून रावसाहेबांनी मागच्यांना थांबवायला उघडलेल्या तोंडातून शब्दच निघेना. ड्रायव्हर कसाबसा ओरडला, "थांबवा रे गड्यांनो लवकर थांबवा!" गड्यांना कसले ऐकू येतंय! स्टार्ट होईपर्यंत गाडी लोटायची त्यांना प्रॅक्टीस झाली होती. आणि जेव्हा ही निलांबरी जाऊन पांढर्‍या आंबॅशिडरवर जाऊन आदळली तेव्हा सरसकट सगळ्यांच्या चेहर्‍यावर तेहेतीस कोटी देव आठवल्याचा भास नामाला झाला आणि पांढर्‍या गाडीतल्या दोन मोठ्या साहेबातल्या छोट्या साहेबाला तर अशी उचकी लागली की ज्याचे नाव ते.

इकडे निळ्या गाडीतल्या रावसाहेबाची गत तर एखादा गरीब कुत्रा चुकून दुसर्‍या दादा कुत्र्यांच्या गल्लीत शिरल्यावर त्याची जी परिस्थिती होते त्या अवस्थेत (पळूनही जातात येत नाही आणि कुणावर उखडताही येत नाही!). त्यांनी जी मान खाली घातली ती जमिनीला टेकायचीच बाकी होती. गाडीमागच्या पलटणीला बसलेला धक्का गाड्यांच्या टकरीपेक्षा कैक पटीने जबरदस्त होता.

बघ्यांची गर्दी जमायला काय वेळ लागतो? ती गर्दी पाहून स्वत:ला आवरत चेहरा शक्य तेवढा निर्विकार ठेवत सगळ्यात मोठ्या साहेबांनी गाड्या हेलीपॅडकडे वळवण्याचा आदेश दिला. जाता जाता मात्र ते निळ्या गाडीकडे वळून पुटपुटले, "तहसिलदार हो या........" त्या त्यांच्या वाक्याच्या गाळलेल्या जागेत अंदाजाने सगळ्यांनी ’अ ते ज्ञ‘ मध्ये येणारी सगळी सुभाषिते भरली.

या सगळ्या भानगडीत नामाला गर्दीत इंद्रा दिसल्याचा भास झाला आणि त्याच्या छातीत भयानक धडधड सुरु झाली. अजून पुढे मंत्री आल्यावर काय होईल याच्या भितीने त्याच्या पोटात खड्डा पडला.

हेलीपॅडजवळ गाड्या थांबल्या. दहापंधरा बायका ते शेणाने सारवत होत्या. तहसिलदार आणि तलाठ्याची बोलती बंद होती. प्रांतानी कसाबसा घशातून आवाज काढला, "साहेब बघो, ये पूर्ण होनेकू आया है."

सारवलेले व्यवस्थित ग्राऊंड बघून कलेक्टरचा चेहरा खुलला. "अच्छा है!" म्हणून त्यांनी समाधानाने मान हलवली. हेलीपॅडला संमती मिळाली तशा गाड्या परत फिरल्या.

उद्याच्या कार्यक्रमाबद्दल अजून कुठलाच फॅक्स कसा आला नाही हा विचार करत कमिशनरच्या पीएने मागच्या पत्रावरुन वेळ बघितली. सकाळी दहा वाजता मंदिराजवळच्या हेलीपॅडवर साहेबांचे हेलिकॉप्टर उतरणार.
कमिशनरच्या पीएने 'सकाळी नऊ वाजता मंत्रीमहोदय मंदिराजवळ उतरतील' असा फॅक्स जिल्ह्याला पाठवून दिला. तो फॅक्स वाचताच कलेक्टरच्या पीएने प्रांताकडे ’मंत्रीमहोदय सकाळी आठ वाजता मंदिराजवळ उतरतील.’ असा फॅक्स नेहमीची वेळेबाबत काळजी घेऊन ताबडतोब पाठवून दिला. प्रांताच्या शिरस्तेदाराने फॅक्स वाचताच तहसिलदाराला तालुक्याला सकाळी सात वाजता मंत्री पूजेला येणारेत हे कळवून टाकले. तहसिलदारने अजिबात 'रिक्स' घ्यायची नाही असे ठरवले असल्याने शेळके तलाठ्याला बोलावून 'मंत्री सकाळी सहालाच इथे पोहचणार आहेत आणि तशा तयारीत रहा' असे सांगितले. मागच्या वेळी एक तलाठी निलंबित झाला होता हे आठवून शेळकेने पुजार्‍याला 'पहाटे पाचला मंत्रीसाहेब पूजेसाठी पोहचतील आणि आरतीची तयारी करायला तुमच्यासोबत माझ्या अशिश्टंटला देतो' म्हणून नामाला तिथे पहाटे चार वाजता बरोबर पक्के पोहचायला सांगितले.

इकडे आदल्या दिवसापर्यंत फॅक्स नाही की फोन नाही म्हणुन कमिशनरच्या पीएने पत्रावरची तारीख चेक केली. त्याच्या लक्षात आले महिन्याचा घोटाळा झालाय. 'तरीच विचार करत होतो चार दिवसाच्या सूचनेवर मंत्री कसे काय येताहेत?' त्याने मनाशी विचार केला. आता रात्र बरीच झालिये, कुणाला काय कळवून आपल्या बुद्धीचे दिवाळे दाखवा! उद्याच्याला लवकर येऊन तारीख बदलली म्हणून फॅक्स पाठवून देईन, या कानाचे त्या कानाला कळणार नाही. झाकली मूठ.... दुसर्‍या दिवशी तो ’मंत्री याच तारखेला याच वेळी पुढच्या महिन्यात येणार असल्याचा, पुढल्या महिन्यात दौरा हलवला गेल्याचा' फॅक्स करणार होता.

तर दुसर्‍या दिवशी मंत्री नऊ वाजता पोहचणार हा फॅक्स मिळाल्याने कलेक्टरसाहेब आठ वाजता मंदिराकडे जाण्यासाठी घराबाहेर पडणार होते. प्रांताकडचा फॅक्स आठचा असल्याने ते सात वाजताच मोठ्या साहेबांच्या बंगल्यापुढे त्यांच्या गाडीतून जाण्यासाठी थांबणार होते. तहसिलदारांना सातला मंत्री येणार कळले होते म्हणून ते सहाला घराबाहेर पडणार होते. शेळके पाचला पूजेचे सामान घेऊन मंदिराकडे निघायला आपल्या M80 ला किक मारणार होता. आणि मंत्री पहाटे चारच्या आरतीला येणार म्हणून आणि होणार्‍या सासर्‍याला इम्प्रेस करायला आणि आदल्या दिवसांच्या मिटींगचे त्याच्या अजून छातीत दुखत असल्याने, नामा पहाटे तीनला अंधारात गल्लीबोळातले भुंकणारे कुत्रे चुकवत मंदिराच्या दारात जाऊन त्यावरल्या कुलुपात इंद्राचा चेहरा बघत उभा होता.....!!!