Thursday 15 February 2007

स्रीसुक्त

आट्यापाट्यांचा खेळ ग
सुरु झाला बालपणी संपत नाही अजुन...
गालावरती सरीता ग!
असायची चिंता भातुकलीच्या खाउची
सगळं आवर आता पुरे कर मैत्रीणिंशी गप्पाटप्पा,
म्हणुन पाठीत मिळायचा धपाटा
तरीही भातुकलीचा मोह नाही आवरायचा ....
आणि यायच्या गालावरती सरीता ग!
लक्ष ठेवणारे किती तारुण्याच्या चालीवर,
बोट नाही ठेवायचे समाजाच्या नियमांवर,
आयुष्याची वाट शोधायची या काट्यांच्या वळ्णावर
असे हे वेडं मुक्ततेचे वेध घेणारे वय
अन आवळायचे नियमांचे पाश .....
मग यायच्या गालावरती सरीता ग!
लक्ष दिव्यांच्या उत्सवात दोन नजरा मिळती
आणि सप्तपदी चालती,
आपला रस्ता त्याच्यामागे कायमचा बदलायचा ग,
मायेचा पदर अन बाबांची ओली नजर,
कायमची सोडतांना......
यायच्या आणि फ़िरुनी गालावरती सरीता ग
त्याचे जे ते सगळे माझे,
माझे ते त्याचे का नाही !
आपली वाट आपण नाही बनवायची,
त्याच्या मागे चालत रहायचे
अपमान, मान, स्वाभिमान....
सगळं काही सोडत सोडत
उरतात फक्त गालावरती सरीता ग......
श्रावणसरी मनावरी
भिजले मी
का ग?
परसदारी ओले अंगण
दारात मी
का ग?
आल्या सरी
सपका मारीत
गंध दरवळे
धुंदित मी
का ग?
भरुन आले मन
त्या नभाला सोबत
रिते होई आभाळ
पण मन असे साकाळ!
का ग?
किती धीटपणे नजरा
मिळाल्या होत्या थेट,
जेव्हा तुझी माझी
झाली होती पहीली भेट
तुझ्या माझ्या
गुंफ़लेल्या श्वासांची वीण
त्यावर आठवांची नक्षी
अन दारातली अबोली त्यास साक्षी!
काल मी तुझ्यापासुन वेगळी झाले,
खर सांगु आनंद झाला
यातच सगळ आल
शरीराची संवेदना
मनाची वेदना
खाली मान पापण्यांचे पान
गळ्यातच अडकलेली गाण्याची तान...
सगळ कस जाणवु लागल आता जगण मला खुणावु लागल!.....
स्वप्नांच्या प्रवाहाला नाही किनारा,
पहा या पामराला नाही उतारा..
जिर्ण झाली व्यथा तरी,
वेदना भोगली रोज नव्याने..
लपवुन सारी वेदना,
हसर्या चेहर्‍याने
मी रोज सामोरी जाते जेव्हा..
सकाळ झाली तरी,
सुर्य माझा उगवला नसतो तेव्हा!!!
माझं विश्व तु होतास
हे तुलाही माहीत होतं
तुझ्यावाचुन गाणं माझं
शब्दाशिवाय रीतं होतं
विसरायचा बहाणा
फ़क्तं तुलाच जमला,
माझ्या गाणार्‍या मनाचा
प्रवास मात्र तीथेच थांबला!!!
तुझी आठवण झाली
नी गायला लागले मी,
चांदण्या वेचत उन्हात,
सार्‍या जगाला सहायला लागले मी!!!
पुन्हा तुझी आठवण
पुन्हा फक्त भास
पुन्हा तीच भलावण
पुन्हा रिक्त श्वास !!!
तु कशी येतेस,
उन्हाच्या तिरीपीने,
वार्‍याच्या झुळकीने,
कळ्यांच्या सोबतीने
अन उमटतेस काळजाच्या ठोक्यातुन,
आठवणींच्या झोक्यातुन!!!
तुझ्या माझ्या भेटीचे
प्रत्येक क्षण..... साठलेले
आभाळही होते झुकलेले
मेघही होते दाटलेले,
पाउस नव्हता मात्र,
होते फ़क्त भिजलेले दोघे

सकाळी सकाळी

अवखळ हवेने फ़ुलाला टिचकी मारली,
फ़ुल फ़ांदिवरुन पानावर घरंगळले
या पानावरुन त्या पानावर करत....
गवताने अलगद झेलले....
हरळीने खुणावले!......
नी पाकळीचा ओठ मुडपत ते गालातच हसले!
हलकेच नखरा करत ते दवबिंदुनी भिजले
सोनेरी किरणांनी न्हातेधुते झाले,
इंद्रधनुषी मणीमुकुट मिरवु लागले,
सकाळी सकाळी आयुष्याचे सुन्दर स्वप्न रंगवु लागले.........

Wednesday 14 February 2007

आज काल डायरितल्या
ओळीत वेदना साचत नाही..
अनाहुत पाहुण्यासारख दुखःही
ठाण मांडुन बसत नाही
अपेक्षांच्या पानगळीत..
निरपेक्ष मन मागे उरलय..
पण.. जर हा शिशिर संपुन परत वसंत फ़ुलु लागला तर..???
असा दरवळु नको आस पास
व्याकुळ होतो मग श्वास श्वास
पुन्हा लागते बघ
मिटल्या क्षणांना
उमलायची आस आस.......

Tuesday 13 February 2007

आता नाही

पुन्हा ती रिमझिम आता नाही
हुरहुर मनी दाटणे आता नाही.
वाहुन गेल्या वेदना..
काही जपलेल्या संवेदना...
त्या... मुसळधार पावसात..
आता ते कोसळणे पुन्हा नाही..!!!
भिजणे आता नाही..
भिजुन पेटणे आता नाही
विझलेले क्षण ते तेवणे आता नाही..
पहिल्या पावसाची धगही आता नाही..
धगधगत्या ह्रुदयाची स्पंदने
ओल्या मिठित ऐकणे आता नाही
ती ओली मिठी सोडवणे पुन्हा नाही..!!!
रेशमी धारात तरसणे.. आता नाही..
प्रत्येक धारेत विरघळणे आता नाही
म्रुदगंध श्वासात भरुन धुंद होणे आता नाही..
मुसळधार पावसाचा जीवास घोर आता नाही...
ती सखी पुन्हा भेटणे आता नाही.....
ती पुर्वीची सखी पुन्हा भेटणे आता नाही...!!!

रात्र

रात्र..
चांदणं गोंदण गालावर उमटत
नजरेत दाटु लागली रात्र..
उन्मादत्या क्षणात,
मोहरत्या मनात हरवु लागली रात्र..
हळु हळु चंद्राच्या कवडश्यात
लाजु लागली रात्र..
आत आत खोल ठिबकत्या
श्वासात भिजु लागली रात्र..
नजरेच्या तीरात,आवेगाच्या
भरात सळसळु लागली रात्र..
व्याकुळ काजळात गुंफ़लेल्या
ओठात अडकु लागली रात्र..
निशब्द, अविचल आज अस्फ़ुट
हुंकारात बोलु लागली रात्र...
स्वप्नफ़ुले माखुन तनात,
स्पर्शात अविरत बरसु लागली रात्र..
रंगवुन माझे विश्व
ओंजळीतुन निसटत जाउ लागली रात्र..
नक्षत्राचा वेल विझवत,
प्राचीकडे झेपावत
अस्तित्व विसरु लागली रात्र..
बेभान धुंदीत तेजात मिसळत
धाऊ लागली रात्र..
दिवसाच्या प्रियकराची ही सावली रात्र...!!!

आठवण

तुटलेला तारा
आणि तुझ्या आठवणींचा पसारा..
मग जीवही तुटत तुटत जातो,
रात्रीच्या निरव शांततेत...!!!

वडील

एक जन्म तरी...
बालपणाला बाय करुन निघाले जेव्हा..
पैजण पाउले अंगणी थबकली तेव्हा...
गहीवरल्या दाराला.. खिडकिचा आडोसा होता
डबडबत्या पापण्यातुन मायेचा कवडसा होता.
माझ्या लाडक्या लेकराला " जपा " फ़क्त
एव्हढच म्हणालात तेव्हा तुम्ही पप्पा..
पाठिवर हात थरथरत होता...
रडता रडता सुध्दा तुम्ही माझेच डोळे पुसत होता. .
सांगत होता तरीही " आठवण नको काढुस,...
भुतकाळासाठी कधी नको रडुस,
स्वतंत्र व्यक्ती तु,... वेगळे तुझे " आकाश "
काळजी नको करुस.. आम्ही सुध्दा राहु इकडे झक्कास " !!
आठवत राहते पप्पा नेहमी तुमच्या सार्‍या गप्पा
करुन घेतलेली १ Aug च्या भाषणाची तयारी..!!
आणि पहिल्यांदा सायकल शिकवली तेव्हाची भरारी..
रागवायचे तेव्हा नजर तुमची करारी...!!
कसं विसरु सारं थांबत नाही हे बरसतं पाणी खारं...
एकदा विचारेन म्हणते देवाला..
मुलीच्या हातात का समाजाने बापाचा " कणा"द्यावा..
त्यालाच का लेकराच्या ताटातुटीचा शाप द्यावा..
कशी होउ उतराई... मनातुन काही जात नाही..
प्रयत्न मात्र नक्की करेन...
तुम्हाला अभीमान वाटेल असे काही करुन दाखवेन..
तेव्हा देवालासुध्दा वाटावे..
एक जन्म तरी मुलीचा बाप व्हावे...!!!

Over flow

बघुनही न उमजणारे.. स्वप्नबिंदु
ओघळुन पडतात गालावरुन.
उठतो तेव्हा ओरखडा.. मनावर...
येउ देत नाही मी माझाच हुंदका कानावर..!!
जाणवुही देत नाही माझे अस्तित्व मनाला.
नाहितर कुठेतरी पडेल ना ठिणगी..
सार काही पेटवायला..
त्यात कदाचित बळी जाइल माझ्या उत्क्रांतीचा..!
म्हणुन विसरत नाही कर्त्यव्याचे माप..
ठेउन देते बाजुला..
बंडखोर मनाचा शाप..!!
पण कसं सांगु..
उन्हातल.. इंद्रधनु खुणावल्याशिवाय राहत नाही..
तरी सुध्दा विचार चाललाय..
कस आवरायच खळबळत आयुष्य..
हे कोड सुटलं की ठरवेन म्हणते..
भावना, अस्ताव्यस्त पसरल्या की वाहवत जातात
अन बांध घातला की overflow होतात..(अस का?)!!!

सुवर्णमध्य

तुझी झेप सुर्याकडे
आणि मला ओढ सावलीची...
तुझे डोळे... उंच कड्यावर
मला ओढ माझ्या हिरव्या डोंगरमाथ्याची..
तुला हवे सारे आकाश.. कवेत
मला माझी धरती माझ्या पुरती...
झेप घ्यावी तीथुन क्षणांपुरती..,
पंख असावे आकाशी आणि पाय जमिनीवरती
मग एक सुवर्णमध्य काढला आपण...
बांधले घरटे झाडावरती....
तिथुन तु गाठतोस रोज नवे आकाश,
वाट पाहते मी तुझी जेवणासाठी दुपारी..
वेळेवर येत नाहिस आता तरी
मी काही फ़ार मनावर घेत नाही..
घर आवरणे,फ़रशी पुसणे,भांडी घासणे..
मी कुठे कमी पडत नाही..!
साग्रसंगीत जेवण, संसाराची ठेवण
आता मी सुबक ठेवते...
तुझ्यासाठी घरटे सजवुन
दाणापाणी हवे ते आणुन देते...
तु केव्हाही येउ शकतो,
रिकामे घरटे पाहुन परतु शकतो..
म्हणुन मी वाट बघत बसते..
काल तुझा मोबाईल विसरलास..
मी देण्यासाठी...
तुझ्यामागे झेपावण्याचा प्रयत्न केला
भरारी तर दुर.. मला उडणे सुध्दा जमले नाही..!!
झेप घेणे उंचीकडे सवय राहीली नाही
मनातल्या मनात सराव करुनही उडायला जमले नाही,
practical difficulties वेगळ्या असतात..
कळणार नाही तुला म्हणायचास ना तु..
किती खर आहे..

उडण्याचे स्वप्न बघुन उडता येत नाही पण...
पंख आहेत हे विसरुन जगताही येत नाही...!!!

विरह

कसा जावा क्षण विरहाचा..
आताच तर बरसायचे थांबले नभ...
अजुन कवडसाही नाही उन्हाचा...
आज.. असेच राहणार वाटते मळभ आभाळवर
आणि असह्य विरह...
पसरलेला दारापुढच्या... वाटेवर...!!!

माझी माती

सरीवर सरी येती...
समरसुन बरसती,
आज... ओल्या मातीला ग..
मायेचा वास का नाही...,
माझी माती लांब सयी...
कशी भेटु.. समजत नाही!!!

जीवनसागरा

खोल खोल गर्ता आणि उंच उंच लाटा...
गर्ता आहे प्रत्येकाच्या मनात ज्याला त्याला..
ठाव नाही लागत त्याचा अजुन कोणाला...
गर्त्याचे लाटेशी नाते,
जसे अंतरंग स्वप्नांशी जोडले जाते
बुडता बुडता आकाशी.. नेती या लाटा..
त्या खाली अंधार्‍या भुयारी.. दगडांच्या वाटा..
लाटेवरती क्षणांचे फ़ेसाळते बुडबुडे...
सारे क्षण.... ते बापुडवाने बुडबुड... उडती...
नाही ठसे नाही खुणा काही त्यांचे उरती...!!!
मासोळीला हवा गर्ता आणि लाटांना किनारा.....
ज्याचा त्याचा आहे इथे वेगवेगळा सहारा...
अनंत विस्ताराचा आहे खोल तुझा गाभारा....
सायंकाळी आवरायचा लाटांचा खेळ सारा...!!!
खोल खोल गहन तु.. जीवनसागरा..
नाही माहित उंची तुज पामरा..
तरीही आवडते तुझ्यात प्रतिबिंबित व्हावयाला
म्हणुन गाठते तुला नभ ते क्षितीजाला...!!!
उमजले तिथेच मला वेडे स्वप्न लाटेचे..
भिडण्याचे आकाशाला...
घेउन उदराशी बिज..
अंकुरण्या किनार्‍याला...
खोल खोल गर्ता आणि उंच उंच लाटा....!!!

व्याकुळ

तु....
तुला डोळे भरुन बघतांना
पापण्या काठोकाठ भरल्या...
धुसर झालास तु...
दृष्टीआड गेलास..,
पण नजरेतल्या पाण्यात प्रतिबिंबत राहिलास,
तु नसतांनाही...
गुलाबी कमळातुन..
आठवणींची मेघगर्दी ओघळत राहिली,
आता तु कधीच दिसणार नाहिस.. तरीही..
पापणी भरुन येतेच मग सारे जगच धुसर होते...
अन त्या डबडबत्या डोळ्यात तुझे प्रतीबिंब बुडुन जाते....!!!