Thursday 4 December 2008

उत्सव

चेह-यावर तुझ्या पाहिला...
काल भावनांचा उत्सव जाहला

उमलुन रात्र आली
अलवार श्वास झाला..
झरत गेले चांदणे आरपार
दिशा पांघरुन आनंद शहारला
चेह-यावर तुझ्या पाहिला....

असे कढ ओसरले की
खुळ्यागत दिन गहिवरला
दृष्टीत वस्तीस घन निळा आला
त्या निळाईची शपथ तुला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

धीर अधीर झाला
कायेस मधुर सुर आला..
क्षण तो सारा, ऋतु बदलाचा
हिरवा पिसारा देउन गेला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

असा साक्षात समोर दिसलास तु
जसा कण कण माझा हरवलेला
निवळत गेला रंग उन्हाचा
अन मनात समीर सरसरला

चेह-यावर तुझ्या पाहिला
काल भावनांचा उत्सव जाहला......

Wednesday 3 December 2008

मौन

तुझ्या मौनाचा अखंड अविरत झरा
अंधारावर क्षुब्ध शांततेचा चरा,

वेढुनी दु:ख आसवांनी आता गीत गावे
किती दिवस असं उगा हसु सहावे,

मिसळुनी भावना अंधा्रात कित्येक रात्री सरल्या..
दिवसाच्या चेह-यावर त्या निर्विकार ठरल्या,

प्रत्येक क्षण मलुल हुंदका सुनविती आज
नुरली ना कुठे का चैत्यन्याची गाज...,

पुन्हा प्रारंभ नवा, का अंत व्हावा..
संपावे हे आडाखे..उत्तरासाठी आता कधी न प्रश्न पडावा....!!!!

Tuesday 2 December 2008

भरती

ती कशी घन गंभीर, बंदिस्त
सागरासारखी खोल... खोल
आत सुध्दा शांत अन फ़क्त शांत
असं तीला वाटायचे...
सगळीजणही हेच म्हणत....
पण एके दिवशी तो म्हणाला..
तु कशी ना खळाळती,
किना-याबाहेर धावणा-या लाटेसारखी
अतर्बाह्य भिजवणारी...

त्या दिवशी तीला पहिल्यांदा
"भरतीचा" अर्थ कळला...

Thursday 26 June 2008

Ball games...........

( Francesca Bardsley ची ही छोटीशी कथा वाचल्यावर आवडली म्हणुन अनुवादाचा पहिलाच प्रयत्न....)

अमिराला कुणा अनोळखी व्यक्तीशी बोलायला घरुन अजिबात परवानगी नव्हती.तसे हिवाळ्यातल्या त्या अंधा-या दिवसात ते शहर भितीदायकच होते, निदान ९ वर्षाच्या मुली साठी तरी... जरी एखाद्याला कुठे जाणे सेफ आहे किंवा काहि झाले तर लपायचे कुठे आणि पळायचे कुठे हे माहित असले तरी ....
पण खालीद काही अनोळखी नव्हता. सगळेच तर त्याला ओळखत होते. त्याचे हसणे , ऐट्बाज बोलणे.. तोंडात एका कोप्-यात सिगारेट धरणे. तो तीच्या वडिलांशी विनोद करुन बोलु शकायचा , तीच्या आईच्या स्वयंपाकाचे कौतुक करायचा. त्यामुळे अमिराला खालिद बरोबर असतांना अजिबात भिती वाटायची नाही.
एके दिवशी ती मित्र मैत्रिणि सोबत खेळत असतांना , खेळ थांबायच्या वेळी खालीद तीथे आला आणि सगळ्यांना समोरच्या भिंतीवरच्या रिंग मधुन कोण दगड टाकुन दाखवते म्हणुन त्याने challenge च केले.
अमिराचे डोळे आंनदाने चमकले, तीने टाळ्या वाजवल्या खुप खुष झाली. पहिल्याच प्रयत्नात तीचा दगड सरळ रींग मधुन गेला होता आणि बाकी कुणालाच हे जमले नव्हते..
"वा मेरी नन्ही गुडिया... सगळ्या या मोठ्या मुलांपेक्षा तर तु कमाल आहेस " खालिद ने कौतुक करता करता sticky pastries ची खाकी पेपर bag तीच्या हातात बक्षिस म्हणून ठेवली.

त्यनंतर अमिराला खालिद खुपदा तीच्या शाळेच्या ground जवळ भेटु लागला, ती त्याला रिंग मधुन ball टाकुन दाखवायची आणि प्रत्येक वेळी तीने आता जास्त चांगली प्रगती केलिये म्हणून ती आनंदाने म्हणायची "आता छान टाकते ना मी चेंडु".. तोही तीला ती आता खुपच व्यवस्थीत ball टाकु शकते म्हणून कौतुकाने प्रत्येक वेळी काहि ना काही द्यायचाच. कधी आईला द्यायला तांदुळ ,कधी मसाले, कधी तीला खाऊ.. चोकोलेट, गोळ्या कधि काय .. शिवाय तो तीला अजुन व्यवस्थीत आणि अचुक पणे ball रिंग मधुन कसा जाइल या बद्दल थोडे शिकवु पण लागला. 'हात मागे करुन आधी नेम कसा धरायचा ' अशा सारख्या सुचना ही देवु लागला. आता ती ball टाकतांना अजिबात चुकत नसे. मग खालिद तीला अजुन नविन नविन लक्ष देत असे.
आता ती दोघं रोजच सोबत जवळच्या ओळखिच्या आणि सुरक्षीत पटांगणावर practise करु लागले होते आणि खालिद चांगला ओळखीचा असल्याने कुणाला त्यात गैर वाटण्याचे ही कारण नव्हते.. तीलाही त्याची भिती वाटत नव्हती. आणि त्याने तीचे कौतुकही केले होते ना की तीच सगळ्या सगळ्या मुलान्पेक्षा ball टाकण्यात जास्त अचुक आहे .
कधी कधी खालीद जमिनिवर किंवा भिंतीवर खुणा करी मग अमिरा बरोबर त्या खुणेवर ball किंवा दगड जे सापडेल ते मारुन दाखवायची आणि अचुक निशाणा लावयची. एके दिवशी त्यांना एक जळालेला ट्रक दिसला. खालिद म्हणाला चला याचाही उपयोग शिकण्यासाठी करुन घेऊ ,अमिरा घाबरली . पण खालिद म्हणाला "त्यात घाबरण्या सारखे काय आहे? चल निशाणा लाव पाहु, त्या तुटलेल्या खिडकितुन बरोबर आत दगड टाकुन दाखव . " ती ट्रक् जरा लांब असल्याने तीला काही सुरवातीला जमेना पण काही प्रय्त्नांनंतर तीने तेही अत्म्मसात केले. ती आता व्यवस्थीत त्या तुटलेल्या काचेच्या खिडकितुन दगड आत टाकु लागली.

एके दिवशी खालिद तीच्या घरी आला आणि म्हणाला "चल पाहु आज नविन उद्देश देतो तुला नेम धरायला . तीथुन टाकुन दाखव मला ball.. तु इतकी हुषार आहेस की तुला नक्की जमेल..." खालिदला घरी पाहुन अमिराला अश्चर्य वाटले कारण तो नेहमी शाळेच्या पटांगणावरच भेटायचा. . आणि कालच तर त्याने एक नविन खुण करुन प्रक्टीस घेतली होती.
ती त्याच्या मागे चालु लागली. पण जेव्हा रोजचा रस्ता सोडुन खालिद वेगळ्या भागाकडे चालु लागला तेव्हा मात्र ती जरा घाबरली. खालिदच्या ते लक्षात येवुन तो म्हणाला " अग भित्री भागुबाई..... घाबरु नकोस तु खालिद सोबत आहेस.".. ती मग तशीच त्याच्या मागोमाग चालत राहिली.. तीने तीचे हात मागे घट्ट बांधले आणि अल्लाची प्रार्थना करु लागली की अम्मी अब्बांनी सांगितले तसे वाइट लोक नको भेटु देवु अल्ला..
ते थोड्याच वेळात एका गल्ली पाशी आले. ती नेहमी सारखी वाटत नव्हती . काहितरी विचित्र तणाव वाटत होत तीथे. पण तीने मनातुन भिती झटकुन टाकली.. "खालिद ने आणले ना आपल्याला इथे मग व्यवस्थीतच असेल सगळं".
" ते बघ समोर बरोबर तीथे हे फेकुन दाखव बघु,...." म्हणून खालिद ने तीच्या हातात एक छोटी शी, कठिण गोल वस्तु दीली, ते नेहमिच्या दगडापेक्षा आणि ball पेक्षा वेगळे लागले तीच्या हाताला पण.. तीला काय त्याने सांगितले की चॅलेंज पुर्ण करुन दाखव की फेकाय्चे.. तीने फेकण्यासाठी चित्त एकाग्र केले. डोळे बारिक केले आणि समोरच्या खिडकिवर लक्ष केंद्रित केले. खालिद तीच्या मागे काही अंतरावर एका मोठ्या खांबाजवळ उभा होता, तीने जेव्हा ती हातातली गडद रंगाची धातुची वस्तु नेम धरुन फेकण्यासाठी हात मागे केला तेव्हा त्याच्या चेह-यावर मंद स्मित आले.... ती वस्तु तीच्या नेहमिच्या practise च्या ball पेक्षा आणि दगडांपेक्षा नक्किच जड होती .
पण तरी तीचा नेम काहि चुकला नाही अगदी अचुकपणे तीने त्या खिडकीतुन ती वस्तु आत फेकली. आणि काही सेकंदातच तेथुन आलेल्या उष्ण मोठ्या ज्वाळांनी आमिराच्या छोट्याशा शरिराला वेगाने फेकले... ती पाठीवर मागे फेकली गेली. काळ्या कुट्ट धुराने परीसर भरुन गेला. त्यात तीला श्वास घेणे अशक्य होवु लागले.....धुराने डोळे चुर चुरु लागले त्यातुन पाणी गळु लागले .. चेह-यावर जखमा झाल्या त्यातुन रक्त ठिबकु लागले.. तीचे हात पाय बधिर झाले.. तीच्या आस पास च्या त्या इमारतीचा भाग तीच्या भोवती कोसळु लागला... पण तीला कसलाच आवाज ऐकु येत नव्हता नुसते काहितरी कानात जोरात वाजल्यासारखे वाटत होते. हळु हळु तेही बंद झाले आता तीला कोणत्याच वेदनाही जाणवत नव्ह्त्या. काहिहि नाही सगळच लांब जात होते फक्त मरण जवळ येत होते..
खालिद मागच्या मागे सटकला होता. कुणाला न दिसता, कुणाला काही ऐकु यायच्या आत.. तीथे फक्त एक चुरगळलेले तपकिरी रंगाचे सिगारेटचे थोटुक त्याच्या ओठाच्या कोप-यातुन निसटुन पडले होते. जसा जसा तो त्या भयानक रक्त पाताच्या दृष्या पासुन लांब जावु लागला तस तसे त्याच्या गालात हसु खुलत गेले.. त्याने रायफल खांद्यावर लटकवली आणि नविन सिगारेट पेटवली...
(समाप्त)

Thursday 12 June 2008

मी अशी ?कशी?

मी डोसा खाल्ला नाही, मी ईडली खाल्ली नाही..
मी साखर सुध्दा साधी कधी चहात घेतली नाही..!!!
भोवताली पार्टी चाले,
ती विस्फ़ारुन बघतांना कुणी गुलाबजाम ओरपतांना,
कुणी रसगुल्ले ढापताना..
मी सॅलड खात बसले..
सगळ्यांच्या सोबत जेव्हा...
वरण भातही साधा मज कुणी विचारला नाही...
मी डोसा.. खाल्ला नाही..मी.............
वडा बघत राहीले.., पावही कधी ना चाखले..
अन पोट भरुन कधीही मी छोले खाल्ले नाहीत
कुणी अग्रह केला तरी,प्लेट भरली नाही..
एकच कोवळी काकडी, अन उकडलेली अंडी..
नाकात अजुन दरवळे ती भरलेली भेंडी..
मी वजन काट्याला भ्याले..,
मी वाढत्या घेरालाही भ्याले..
मी मनात सुध्दा माझ्या कधी भजी तळली नाही..
मी डोसा खाल्ला नाही मी....... .....
मज नाश्ता जर का मिळता मी गाजर खाल्ले असते
कुणा बोलवले घरी तर रताळे उकडले असते..
म्हणुन मजकडे कोणी आले वा गेले नाही..
मी अश्शी स्लिम आहे... की एक कपडाही कधी......
उसवावा लागला नाही....!!!!



हे मागे कधीतरी मायबोलीवर टाकलेले विडंबन एकाने स्वत:च्या नावाने त्याच्या पेज वर खपवलेले दिसले. मग वाटले आपणच आपल्याच नावाने टाकावे.

Tuesday 22 April 2008

वसुंधरेच्या दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा..!!!

वसुंधरा दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा..!!!
(त्यानिमित्त खालील पोस्ट बदलते)..

माझी आवडती लेखिका..Patience Strong म्हणते..
for all our vaunted cleverness we cannot understand.

The beauty and the mystery of nature's wonderland. the sun ,the moon ,the whirling stars ,the sea, the sky.
the earth..............
All the many miracles of life and death and birth ....

Man with marvellous machines can do stupendous things.
But could not with his hands create a bird with voice and wings.
Could not say what magic holds the planet in its place
OR how the spider spins its dainty web of fairy lace....
He can not make a blade of grass, a leaf,a cone, a pod..
yet he is too arrogant to give the praise to GOD.


When bees hum in the linden tree and roses bloom in cotage plots. Along thebrookside banks we see the blue of wild forget- me -nots.
Shy flowers that shun the prying eye- content to let the daisy hold,
The glances of the passers -by with brazen stareof white and gold.
forget-me-not.!!! From long ago it stirs the thought of happier days.
For memories like wild flowers grow-along the hearts untrodden ways.

Monday 21 April 2008

दोन राजहंस,दोन बदकं, एक बदकिण एक पाण कोंबडी आणि मी










आजचा दिवस एकदम झक्कास होता. सकाळी सुपर मार्केट मध्ये ट्रोली भरली आणि पर्स मध्ये वॅलेट च नाही.घरी येवुन परत जावे लागले.नशिब आधी पेट्रोल स्टेशन वर नाही गेले.पण अशी सुरवात होवुनही... आजचा दिवस सुरेख गेला, एखाद्या दिवसाचे धागे आधीच विणले जातात .. मग आपण कीतीही ठरवले तरी तो तसाच जातो का ?? बहुतेक ..

सोनसळी ~ऊन खुप दिवसांनी अंगाला बिलगत होते चल फ़िरायला म्हणून.अर्धा एप्रिल गेला तरी छान ऊन पडले नव्हते. आज
मग माझा मोर्चा एका आवडत्या जागेकडे वळ्ला नेहमी प्रमाणे.. खुप परिक्रिमा झाल्यात इथे तरी पण .... जादु झाल्यासारखी ऊन पडले की मी या जंगलाच्या दिशेने चालु लागते. हिरवपण हळु हळु अंगात भिनु लागते आणि माझे पाय भराभर पडु लागतात. निश्चल तळ्याकाठी तर कधी किर्र्र झाडीतुन जी वाट आवडेल तिकडे.. ऋतु चे प्रत्येक रुप बघायचे अनुभवाय्चे या वेडाने वा-यासोबत वेड होवुन निसर्गावर उमटलेले ऋतुचे प्रत्येक ठसे बघण्यासाठी धावय्चे..

जसे लहान पणी शेरलोक होल्म्स हातात आले होते तसा त्याचा चेहरा डोळ्यासमोर असायचा.... सतत..... भयानक क्रेज़ होती /आहे मला शेरलोक्स च्या प्रत्येक गोष्टीची,.... त्या गोष्टीतल्या वॅटसन ने वर्णन केलेल्या प्रत्येक कथेची!
त्याची चौकडीची कॅप, मोठा लांब लचक over coat ,तोंडातला पाइप, वॅटसन चे बोलणे, Mrs.हडसन, घोडा गाडी तीचा खड खड आवाज, अंधारे थंडीतले वातावरण ...... मूर लॅंड ,ती दगडी घरे ,माळरानं,...शेती, मेंढ्या, झरे ,प्रचंड बुंध्याचे वृक्ष.. कॅनल सार्ख्या नद्या, इंग्लिश मन चे वर्णन त्याच्या हाततली काठी,विंटर कोट, कॅप आणि कुत्रा.., चिख्लातले ठसे, सतत पडणारा पाऊस....... रेल्वे स्टेशन्स,पोस्ट ओफ़्फ़िसेस.. गवतच गवत सगळीकडे अशी लांबलचक कुरणे...... सगळं बघायचे होते. कदाचीत ते स्वप्न पाहिल्या मुळेच ध्यानी मनी नसतांना.. चाकोरीतली १० ते पुढे कीतीही वाजेपर्यंत चालणारी नोकरी व्यवस्थीत चालु असतांना.. शेवगाव हुन मी stamford ला येवुन पोहचले. Alkemist मधला मुलगा स्वप्नांचा शोध घेत निघतो तशी....:)

१८९० सालातले इग्लंड माझ्या डोळ्या समोर घेवुन मी इथे आले होते शेरलोकच्या पुस्तकातले , internet च्या युगात मी stamford बद्दल एक अक्षरही न वाचता न पाहता इथे आले ..... काहीही मनात न आणता!!! डोक्यात फ़क्त एकच गोष्ट होती बेकर स्ट्रीट आणि ट्रेनने जीथे जीथे शेरलॉक जायचा तीथली वर्णने,... जायचेच तीथे एकदा, नक्की!! मी नेहमी डोळ्यासमोर आणाय्चे !! बाकी england मध्ये येवुन काय कराय्चे हा विचारच केला नव्हता . त्या काळी म्हणे हजारो पत्र जात होती शेरलॉक च्या नावाने त्या कलपनिक पत्त्यावर! मी असती तर मी ही एखादे पत्र त्याला नक्के लिहिले असते. जशी जशी माझी गाडी एअर पोर्ट वरुन निघुन आत आत शिरु लागली तसे ते जुने पुस्तकाच्या जुन्या पानातले england जसेच्या तसे उलगडत गेले.हिरवाई नजरेत भरु लागली.. ओसाड जागा क्रुत्रिम पणे उगवलेल्या जंगलांनी भरल्या..थोडे बदलले आसले तरी ते आजही तसेच वाटते आहे काहीही बदल न झाल्यासार्खे.. रस्त्यावर घोडागाड्यांऐवजी फ़क्त कार्स आहेत.आजही country side English man ने हळवे पणाने जपली आहे.

मी एक painting केले होते भारतात असतांना त्यात खुप सारी गुलाबी झाडे , येल्लो स्टोन हाउसेस्चे टुमदार town अस काही बाही कधीही न बघितलेले दाखवले होते . कुठलाशा painting च्या फोटोवरुन मी ते चित्र काढले होते. त्यावेळी अशी झाडे, अशी घरं असतात का?हा प्रश्न मनात आला होता आणि काहि वर्षांनी मी तशाच झाडांच्या अंगणात उभी होते तशाच घरासमोर.. !!!!! मध्ये एकदा घरी गेल्यावर त्या चित्रा पुढे मी जाऊण उभी राहिले तेव्हा मला त्यतल्या ब-र्याच गोष्टींन्चा नव्याने अर्थ लागला.

आणि मी तेच केले दिवसच्या दिवस कुरणे फ़िरली मेंध्यामागे पळाली.. मूरर्लॅंड मधुन चालले.. हीथर ने झाकलेल्या मूरलंड.. गुलाबी जांभळ्या सुरेख दिसतात. शेतच्या शेतं पालथी घातली.. रस्त्य्ने कधी सोबतीला Phasant ची जोडी तर कधी हरणांचे टोळके , कोल्हाही येवुन दर्शन देवुन दिसेनासा व्हायचा मुठ्भर आकाराचे रंगिबेरंगी पक्षी , उतरत्या छपरांची कौलारु घरे, मन हिरवे करणारी नजर जाइल तीथ परयंत हिरवळ.
गाडी रस्त्याच्या कडेला लावता़च पॅक पॅक पॅक पॅक करत झुंड हजर झाली माझ्या माझ्याभोवती.. बदकांची ही टोळी म्हणजे भल्या भल्यला घाबरवुन सोडते.. शूजवर चोचिंनी मारुन हैराण करते. मग त्यामागोमाग गीज धावत येतात,मग छोटी बदके मग सरते शेवटी राजहंस .. पण यावेळी एक रांजहंस अंड्यावर बसला होता पाण्याच्या शेजारी अगदी रस्त्यापासुन ७..८ फ़ुटावर त्याने की तीने?? मादीच असावी , छानसे घरटे बांधले आहे. समोर चाललेल्या सगळ्या ब्रेड वाटपाच्या गोंधळाकडे ती जराही लक्ष देत नव्हती. बदकांचा गोंधळ तीला रोजचा असावा.. मनापासुन फ़क्त अंड्य़ावर बसुन एकाग्र चित्ताने सगळे लक्ष घरट्याकडेच! आपले नुसते बसणे सुद्धा enjoy करता येते ? ते पाहुनच मला जे मिळालेय ते आनंदात राहुन enjoy करावेसे वाटते.बसल्या बसल्या चोचीने इकडची काडी तिकडे कराय्ची बास.. तीचा साथीदार दुसरा राजहंस मात्र तिच्या बाजुला जाणा-या गीज कडे/प्रत्येक मोठ्या पक्षाकडे लक्ष ठेवुन होता. कोणी आसपास गेले रे गेले की याने झेप घेवुन हाकलुन लावायचे.
ब्रेड संपल्याव्र मग मोठ्या गूज चा गोंधळ थांबला आणि पुन्हा निवांत् पणे पंख झटकुन ते शेतात जावुन पडले.झगमगीत निळ्या मानेची बदके, शुभ्र पांढरे राजहंस, तपकीरी काळ्या मानेचे गीज.. वाळलेल्या पिवळ्या पाण गवताच्या काड्यांवर्ची सगळ्यांची घर्टी.. लहान पक्षांचा हल्कासा गोंगाट ...पाणी नितळ सुंदर चकचकित दिसत होते सोनेरी उन्हात मस्त चमचमत होते. सतत पडणा-या पावसामुळे नेहमीच हिरवळ असते तसा चि्खलही असतो पण सगळे रस्ते व्यवस्थीत बांधणीतले आखिव रेखीव वळणा वळणाचे धावणारे नागमोडी .. खाली वर उंच खोल.. काळेशार ! सोबत फ़क्त नाजुक आवाजातली किलबिल चिवचिणारे रंगिबेरंगी नाव माहित नसलेले पक्षी.
मी तलावाच्या दुस-या बाजुकडे गेली तीथे छॊटी दोन बदके एका त्यंच्या मैंत्रिणिच्या मागे मागे फ़िरत गोंडा घोळत होती. ते त्रिकुट बराच वेळ पाण्यात कधी काठावर असा नुस्ताच टाइम्पास करत भटकत होते. अगदी निवांत गप्पा हाणत काही काम धाम नसलेल्या कोलेजच्या मित्रांसारखे. पण त्यांचे एक वैशिष्ट होते त्यांच्यात जी बदकिण होती ना तीच तिघांच्यात पुढे चालत होती बाकी दोघे नुसतेच मागे मागे ..
मी काठावर उभी राहताच, लांबुन डौलदार मान पाण्यावर हेलकावे खातांना दिसली . इथे अजुन दोन काळे... लाल चोचीचे राजहंस असतात ते दिसले नाहित. पुढल्या दोन सेकंदात दोन बाकदार माना माझ्या पुढ्यात येवुन ठेपल्या.संथ एका लयीत दोघे शांतपणे पाण्यावर चरु लागले. बुड वर करुन ते जेव्हा खाद्य शोधायला पाण्यात शिरतात ना तेव्हा फ़ार विनोदी दिसतात.दोघे राजहंस माझ्यासमोर येवुन कधी वर मान करुन बघत तर कधी आपले एकमेकांशी कुजबुजत ,शांत सावली, झिळ्मिळ हिरवे पाणी आणि लकाकते ऊन ती शांतता आणि घनगर्द सावली ती्थे उभे राहुनच अनुभवायला हवी ती पकडता येत नाही काळ्या रेषा असो की रंगीत कशातच. मी कॅमेरात टाकण्याचा ऊगाचच प्रय्त्न करत होते.
बाकिच्या तीघांचे आपले अजुनही तेच चालु ती पुढे आणि बाकी दोघे मागे. नाहि म्हणायला एक पाण कोंबडी यांच्यात येवुन सामिल झाली. तीची सारखी हलणार्री मान या सगळ्या चित्रात एकमेव हलती गोष्ट होती. पाणी सुध्दा इतके संथ बहुदा वा-यावर हलायचाही त्रास नको म्हणत होते.तपकीरी ओबड धोबड झाडांवर नुकतीच पोपटी हिरवाई उगवुन आलेली तो नाजुक रंग फ़ार देखणा दिसत होता, आजी बाईने झुळझुळीत पातळ नेसावे आणि मिरवावे तसा..
पांढरे पिवळे तांबडे सगळे डॅफ़ोडिल्स आता कोमेजाय्ला लागलेत पण तळ्याशेजारच्या मोठ्या एल्म च्या झाडाखाली अजुनही गर्दी करुन काही पांढरी फ़ुले मजेत खिदळत होती. पलिकडच्या झाडी खाली मेंढ्यांचा एकमेव राष्ट्रिय कार्यक्रम "चरणे" चालुच होता.आता छोटी बछडी आली होती मागे पुढे करत ढुश्या देवुन आईला बिलगत चालत होती... हसत होती ....खेळत होती. मेंढी कधी हसत नसावी अस तीच्याकडे पाहुन मला नेहमी वाटते ...पण पिल्ले एक्जात सगळी बच्चेकंपनी कोणत्याही प्राणी मात्रांची असोत.... जीतकी निरागस अल्लड तीतेकीच मेंढीचीही... ही पण मोठे झाल्याव्र त्या मोठ्या मेंढीसार्खी एरंडेल प्यायला सारखा चेहरा करुन कायम फ़क्त चरत राहणार का???
बाजुला एक गीज चा थवा निवांत बसला होता काही जण माना पंखात खुपसुन घोरत होते तर काही नुसतेच पहुडले होते.माझ्या समोरची राजहंसाची जोडी या सोनेरी वा्तावरणात माझ्या पायजवळ येवुन उभी राहिली उन्हात!!! सोनेरी उन अंगावर घेत चोचीला चोच मिळउन.....आता एखादे गाणे म्हणतात की काय अशा पोज मध्ये ... सुरेख!!! (क्रम्श:)

Sunday 20 April 2008

ऋतु माझा

तुझ्यात नादावला जीव
भिरकावुन दिला होता
कसा कोण जाणे.. .
पावसात पहिल्या
उगवुन आला आता ..
सावली तुझी रुपेरी ढगाची शिव
सर बनुन गाता गाता...
एका क्षणाचे गहिवरणे..
अन कोवळा थेंब अंगणी
रुजला जाता जाता
तीन्ही सांजेला झाला खुळा जीव
आभाळागत न्हाता न्हाता
ऋतु माझा फक्त म्हणे
पावसाळा आता..

Saturday 19 April 2008

punhaa

एक चुकार सर मुक
निवली लाही लाही
अनिवार बांधावर
दुर दुर काही नाही..

नितळ झाले दु:ख,
हलके हलके गाई,
गलबलुन कागदावर
उतरली थोडी शाई..

प्राक्तनाचे निश्चल मुख
मन निर्विकार पाही,
नाही आनंदी दरवळ
नाही उदास काही..

काळोखात विन्मुख
चाहुलीच्या दिशा दाही
पुन्हा जीव चौखुर.. तीच हुर हुर
अंतरंगी अकस्मात ओढाळ वाही..

Monday 31 March 2008

kahi rang..


who moved my cheese!

काल Laura ला निरोप दिला.. आमचे सगळ्यांचे डोळे भरुन येणारच होते.. पण हल्ली तशी सगळीजण शिकलेली असतात.. "emotional नका होवु" म्हणत आम्ही खिदळत होतो.. भावना लपवायची overacting... करत..हसत खेळत निभावुन नेले.. विशेष काही वाटले नाही.मी विचार करायचे "कीती छान शिकवते नाही ही, किती खेळकर हिच्या सोबत वर्ष अगदी छान जाइल, समरचे रंगिबेरंगी दिवस ,हिच्यासोबत आणि सगळ्या मैत्रिणि... मस्त!! ...पण वर्ष व्हाय्च्या आत लाराने नोकरी सोडत असल्याचे जाहिर केले.माझे चीझ...??"रोज चीझ समोर ठेवुन, त्यासाठी आज काय केले तर एव्हढे काम, एव्हढा अभ्यास, एव्हढा स्वयंपाक..,एव्हढी चित्र ,एव्ह्ढे लिखाण.. हे याचे, ते त्याचे कीती किती केले... ??? काही कंटाळत, काही सवयीने काही हवे होते म्हणुन काही नुसताच टाइम पास.. नुसतीच जगण्याची overacting.. खुप् काही केले असे वाटण्याची overacting... प्रत्यक्षात काय करायचे होते, काय करतेय कशाचा कशाला ताळ मेळ नाही.. या इतक्या बीझी पणातुनही शेवटी तरीही स्वताची कीव येत राहते. किती ती मी गरिब बिच्चारी, पळत्येय नुसती!!! कुणी माझ्या साठी किंवा माझ्या सोबत दोन पावले चालेल का? की मी अशीच एकटी जन्माला येवुन एकटी मरणार? श्या! हे असं गरिब बिच्चारे वाटुन घेणं फ़ार फ़ार वाईट..सुर्यास्त होण्या आधी जेवढी पळ्शील तेव्हढी जमिन तुझी म्हणुन पळायला सुरवात केलेला विसरुन जातो परत येण्यासाठी सुध्दा धावावे लागेल हे आणि जातो ..कायमचा जातो.. अगदी तसच त्याची जितकी किव येते तितकिच ..रोज सगळं काही सुरळीत चालु असण्याची over acting, ... महानगरपालिकेच्या निवडणुका आल्यात म्हणुन घराचा "परवानगी न मिळालेला कोपरा" गुपचुप बांधुन घ्यायचाय म्हणुन भेटायला न येणारी मैत्रिण, दुसरी एक नव-याला नेहमी सांग्रसंगीत जेवण लागते म्हणुन कधीही वेळ नसलेली..(कौतुक की तक्रार काही कळत नाही), कुठेतरी खदखद्त राहते इतकी काही मी अजुन चीझच्या आधीन झाले नाहीये( तेव्ह्ढेच एक समाधान), आयुष्यभर घराचा एक एक कोपरा कसाही करुन वाढवण्याचे स्वप्न तीचे!!!! आपल्या चीझ वरुन जराही नजर हटु न देणारी अशी अनेक माणसे रोजच भेटतात. मी ही माझ्या चीझ वर नजर ठेवुन असते. प्रकार असतात चीझ चे दुसरे काय!!!दिवसाची रात्र होते, रात्रीचा दिवस होत नाही..... उजाडुनही तेव्हा... टक्क सकाळी नुसता अंधार मनावर साचुन असतो.. नुस्ता अंधार.. त्यात चालतो पाठशिवणीचा खेळ.... जगाशी तुमचा.. तुमच्या जगाशी तुमचा, जगाचा तुमच्याशी !!!आयुष्य थांबुन राहते..... घड्याळ मात्र टक टक टक्टक.. करुन .. झोप उडवुन देते... ......खोटे हसा.. खोटे खोटे दिसा, दीनवाणे पणे हसा,स्वतावर हसा, स्वताकडे पाहुन हसा नाहिच जमले तर दुस-यला हसा (सगळ्यात सोपे) ..पण हसत रहा!!!सावलीही दिसत नाही या अंधारात .. की सावलीचाच अंधार होतो? अस्तित्व विरघळुन टाकणारा अंधार! खुप वेड होते ना सावलीचे!.. उन नको वाटायचे तेव्हा.. अजुनही हिम्मत होत नाही उजेडाकडे तोंड करायची! बरी वाटते ही अंधारी गुहा, जीथे चालतो स्वप्नांचा खेळ.. ९ते१२, १२ ते३, ३ते६... ६ते९..पुन्हा ९ते १२.. तीन्ही त्रिकाळ.. अस्तित्वहीन स्वप्नांचा खेळ..बघणारेही खुष full entertain आणि दुस-याचा "खेळ" होतांना मजा वाटते शिवाय तो बघता बघता स्वता:चा होणारा "खेळ" विसरायला होते. आणि मी देखील.. busy राहते या खेळात..समोर माझे चीझ.. मग आठवतच नाही की "या virtual सावल्या" त्यांना काही अर्थ नसतो.." नुसती चित्रकथा.. कारण त्यात रीटेक.. कट..आणि पुन्हा पुन्हा दिलेले shot..न देता direct हवं ते मिळवता येते, मेकअप ने झाकलेले चेहरे , हव ते बोलतात हव तेच करतात.. अंधारातल्या या खेळात अंधार नसतो."आपल्या हसण्याची दोरी, आपल्या रडण्याची दोरी ,आपल्या असण्याची... दिसण्याची.... अस्तीत्वाची सगळ्या सगळ्या ची दोरी दुस-याच्या हाती देवुन गम्मत बघणा-याचे हेच होते" ..... नुसते "चीझ" सांभाळुन बसणा-याचे हेच होते, कुणीतरी आजकाल हे ओरडुन सांगत असते.. हळुवार उलगडत जाते दु:ख, अल्वार पणे नुसतेच डोळ्यात पाणी साचुन येते. ओझं पेलवत नाही त्यांना कधी कधी स्वप्नांच.. !!
यांत्रिकपणे केलेली एखादी continental, असो की Chinese dish चांगली होते अगदी रेसीपी book मध्ये बघुन केली नाही तरीही.. अगदी व्यवस्थीत हात हलतात त्या loud music च्या तालावर जेव्हा Justine तोंडाला लावलेल्या माइक मधुन जिम मध्ये भराभर सुचना देते.., अगदी प्रत्येक कृती कशी व्यवस्थीतच झाली पहिजे सवयीने.. अहं अजिबात चुकाय्चे नाही, चुकिच्या दाराला धक्काही लागायला नको, लक्षात राहतात चुका सतत बोटात घुसलेल्या शीळेसारख्या टोचत राहतात. बाकी काही कुणी कुणाचे काही लक्षात ठेवत नाही.
चन्द्र.. आकाशात नुसता.. शांतपणे येवुन उभा राहतो. (यांत्रिकपणे???). तोही सवयीने नुसताच बघणे होते.. खुप चांदण्या "लावुन" घेतल्या इथे रूम मध्ये, रात्री टक्क डोळ्यांनी चांदण्या मोजणे सवयीने,प्रत्येक अणु रेणु शी नाते जोडण्याची,त्या कडुन मायेच्या अपेक्षेची सवय, जेव्हा जे वाटेल ते कराय्ची सवय , भलत्या वेळी भलते काही तरी करायची सवय,अंधारल्या शांत प्रदेशाची सवय,शांतता पोटाशी कवटाळुन दिनवाणे पणे आवाजाची वाट बघण्याची सवय .. !!जीव आक्रसत जातो प्रत्येक अनिच्छेने उचललेल्या पावलावर आणि असाच तो एके दिवशी संपुन जाइल छे,नाही होवु देणार नक्किच नाही, हिवाळ्यातली उजाड झाडे वसंतात धुमारे घेउन येतातच ना तसाच हा ऋतु जाइल! उत्तर काय हे शोधायचे नसते आपोआप सापडले तर ठिके नाहितर आपले आपणच तयार करायचे असते..
एक आख्खा हा समोरचा सायकामोरचा वृक्ष बनायला काय लागले असेल फ़क्त एक बी... एक त्याचीच पेशी.. तेव्हढीही नाही जवळ?, नक्किच असेल..पावलांना दिशेचे धुमारे फ़ुटायला हवेत.. उबेच्या चीझ चे आकर्षण कमी होवुन उन्हाची ओढ वाढली की सगळे प्रश्न सुटतात.अनिश्चिततेच्या वर्तुळाकडे दुर्लक्ष केले की निश्चिंत मनाने जगता येते स्वत: केंद्रबिंदु होवुन.....

Thursday 7 February 2008

उत्तर निसटत जाते
ओंजळीतुन वाळु सरकावी तसे
त्या प्रतिक्षेत प्रश्न मात्र तसेच
ओंजळीत कविता बनुन..

Sunday 3 February 2008

नदी

हळुच दरीत मान मोडित,
मटकुन घेई मुरका रानात..
मनकवडी ही निर्झराची ताई,
नदी ठुमकत जाई..

माळेचे मोती खळखळत
काताळातुन झळझळत..
तोर्‍यात भासे ही ठाई ठाई,
नदी ठुमकत जाई

रानची हिरवी पीरती अन
उधाणलेले तारुण्य,
किनार्‍याची माया सांभाळुन घेई..
नदी...ठुमकत जाई

रुप लेणं अस देखणं
फ़ुलं पानं माळलेल...
लव्हाळीच्या बटांना वरुण स्पर्शुन जाई
नदी...

स्वतावरच भाळत..
मरुताच्या खळीने अलगद हसत
सार्‍या गावातुन मिरवुन घेई..
नदी...

तरुची घसट, वृक्षांची लगट
कड्याचा कटाक्ष ,सोडत सारे..
कुणाच्या ओढीने ही एकली जाई..
नदी...

झिळ मिळ जीव तीचा..
गलबल पाही ,
मिटवुन सा-यारेषा..सरीता सागर होई..
नदी ठुमकत जाई..!!!

Saturday 2 February 2008

आपली आपली मॅरॅथॉन .......

(
आपल्या प्रायोरीटीत शरीर हे सगळ्यात शेवटी असते कारण स्वतापेक्षा दुस-यांकडे लक्ष द्या( याचा अर्थ नाक खुपसणे असा च असतो ब-याचदा)... त्याग करा.. ही आपली संकृती... त्यामुळे आपल्या शरीराकडे लक्ष देणे हा रोजच्या जीवनातला दुय्यम भाग आहे. ब-याच जणांना..हे ऐष करणे वाटते.. तर बायका घरात एव्ह्ढे काम करतो आणि वर व्यायाम? वेळ कुठे आहे असले उद्योग करायला? म्हणून व्यायमा पासुन लांब असतात.. आपल्या रुटीन मध्ये का कोण जाणे शरी्राकडे लक्ष देणे फ़ार आलेले नाहीये.. माझ्या बदलीच्या तालुक्याच्या गावी.. मी सकाळी लवकर उठुन जवळच्या खेड्यापर्यंत चालत जाउन यायचे तेव्हा आमचे घरमालक आणि मालकीण, त्यांची कॉलेज मध्ये जाणारी मुले नुकतीच आवरुन बसलेली असायची. माझ्या व्यायाम प्रकाराकडे सगळेच फ़ार विचित्र नजरेने बघायचे..शहरात तरी थोडे.. वातावरण आहे पण तालुक्याच्या गावी म्हणजे फ़ार विचित्र.. रस्त्याने कोलेज मधली मुले .. " काय exercise का? म्हणुन टोमणा मारायचीच, नाहितर दात विचकुन हसुन पुढे जायचीत.. पण मला त्याने फ़ार काही फ़रक पडायचा नाही..) त्याच वेळी ५..६ वर्षांपुर्वी हे कात्रण युवा सकाळ मधुन काढुन ठेवले होते ते जसेच्या तसे इथ देत आहे.. हा लेख मला मार्गदर्शक म्हणुन मी वापरला.. आणि आता हरेक्रिशनाजी यांच्या blog वर वाचुन मला हा लेख इथे टाकावासा वाटला..) .



.तीन वर्षांपुर्वी न्युयार्क शहरातील एक दुपार. एका प्रसिध्द बॅंकेत जगभरातील निवडक अशा चलाख गुंतवणुक दारांसमोर एक तरुण उद्योगपती बसला होता .आमची इंडस्ट्री ही भारतातील एक मोठी इंडस्ट्री आहे.आमच्या मध्ये तुम्ही पैसे गुंतवा.ते सुरक्षीत राहतील आणि दामदुपटीने वाढतील. अशी त्यांना माहित देत होता. त्याने सादर केलेले सर्व balance sheet ,आकडे त्या गुतवणुकदारांना पटत होते. त्यातल्या एकाने या तरुण उद्यो्गपतीला ताडकन विचारले,"जगभराचे पैसे तुमच्या idustry मध्ये येतील, तुमचा उद्योग चांगल्या condition मध्ये आहे पण... तुम्ही स्वत: आहात काय?
हा प्रश्न अगदी अनपेक्षीत पणे ऐकुन तो तरुण चपापला असावा. त्याने स्वत:कडे पाहिले . तो दारु पीत नव्ह्ता. सिगारेट ओढत नव्ह्ता पण लेट नाईट्रल आणि जगभरातले चमचमीत खाणे याने त्याचे वजन शंभर किलोवर गेले होते आणि ते त्याच्या शरीरावरुन सहज दिसत होते.
काय विचार आले असतील त्याच्या मनात? तो रागवला? मनातल्या मनात् म्हणाला असेल , काय तुझ्या बापाचे खातो का? का त्याने समर्थन केले असेल ? मी दिवसातुन १४ तास् काम करतो म्हणुन मला व्यायामाला वेळ नाहि. त्याने यातले कुठलेच उत्तर दीले नाही. शांतपणे म्हणाला "You are right, next time you will see the difference...!"
भारतात गेल्यावर त्याने दोन आहारतज्ञांना बोलावले. ही आई मुलीची जोडगळी भलतीच कडक निघाली. त्यांनी प्रथम विचारले "तुम्हाल नक्की वजन कमी कारायचे आहे ना?"त्यासाठी श्रम करायची तयारी आहे ना?? "
लगेच order सुटली.. चहा, कॉफ़ी बंद.. बापरे! हा तरुण तर दिवसातुन दहाबारा कप चहा प्यायचा...
चहाबरोबर दुध बंद, लोणी बंद, जॅम बंद, साखर बंद.. यांची यादी वाढतच चालली.. याने मान डोलावली..

पुढचे काही महिने याने फ़ळांचे रस, फ़ळे, उकडलेल्या भाज्या यावर काढले .पोटात भुकेचा डोंब उसळल्यावर एका रात्री याने या बाईना फोन केला.. " खुप भुक लागलीये .. झोप येत नाही.. काय करु?" त्यावर "एक ग्लास पाणी पीउन शांत झोप " असे उत्तर आले..
हळु हळु याला आता त्या कडक डायेट्ची सवय झाली. त्याचा थकवा नाहिसा झाला. त्याला झोप लागु लागली. अधीक ताजे तवाने वाटु लागले, तो न दमता , न थकता काम करु लागला. इतके दिवस चमचमीत खाणा-या त्याच्या जीभेला आता साध्या पदार्थात गोडी वाटु लागली.
साधा आहरही चविष्ट असु शकतो हे पटु लागले. त्याचे वजन उतरु लागले. तो १०० किलो वरुन ७० किलोवर आला.

दोन वर्षानंतर परत तो न्युयार्क ला आला असता त्या प्रश्नकर्त्याला भेटला. पण त्याने म्हटले "This is good, but is it enough ?" म्हणजे? ते पुरेसे नव्हते. आपल्या न्युय्यॉर्क च्या दौ-यात त्याने तेथील मॅरॅथॉन पाहिली. आपण हे करु शकु? २६.२ मैल धावणे. या तरुण उद्योगपतीला चलेंजेस आवडतात. न्युयोर्क मॅरॅथोन मध्ये दर वर्षी कमितकमी ३०००० लोक धवतात .त्यातील किमान ५०० पंच्याहत्तरी ओलांडलेले असतात. तर काही नव्वदी पार केलेले असतात. ह्यात तुमची स्पर्धा असते स्वत:शीच तुम्ही चिकाटी दाखवत परिश्रम करत धावतात. तुमचे श्रम, चिकाटी हाच तुमचा आनंद.. या तरुणाने प्रयत्न सुरु केले.

मुंबई पहाटेचे तीन वाजलेत, सर्व जग झोपलेले असता हा तरुण उठतो. एक ग्लास फ़ळांचा रस पिउन आपल्या जिम मध्ये जातो. अर्धा तास "warm up" करुन पाठीवर दहा किलो वजन बांधुन २० मजली इमारतीचे जीने धावत चढतो.. मग खाली आल्यावर तो driver ला सांगतो. आज आपण सहार एअर पोर्ट पर्यंत पळायचे आहे. कुलाबा ते अंधेरी आणि परत!सोबत त्याची गाडी.
तो धावायला सुरवात करतो..त्याची पावले एकापुढे एक पडताहेत त्याच्या धावण्यात लय आहे. तो धिम्या गतीने धावतोय. सध्या रस्त्यावर कुणीच नाही. फ़क्त काही दुधाच्या गाड्या आहेत. तो पळतो आहे.
हळुहळु पहाटेची वर्दळ वाढली आहे.पहिल्या पाळीचे कामगार ,शाळेत जाणारी मुले त्याच्याकडे कुतुहलाने बघतात. त्यांना बाय करीत तो धावतो आहे. खाच खळग्यातुन-खड्यातुन, चढ उतारावरुन त्याची पावले पडताहेत. .आता त्याला मॅरॅथोन मध्ये धावायला ४ तास लागताहेत. दिवसातुन दहा तास बैठे तास करणा-याला ४ तास ही वेळ चांगली झाली.तो आठवड्याला १०० किलोमीटर धावतो. महिन्याला ४०० किलोमेटर म्हणजे पुणे ते मुबई आणि परत .. तीन वर्शांपुर्वी एक जिना चढतांना त्याला धाप लागयची..

हा उद्योगपती आहे "अनिल अंबानी"..
तो म्हणतो " पैशाने तुम्ही सगळ विकत घेउ शकता पण तुमचे आरोग्य तुम्हालाच श्रमाने कमवावे लागते..."

ध्येय निश्चीत कराय्चे .. मग कुठल्याही क्षेत्रातले.. आरोग्य,अभ्यास, खेळ.. ते साध्य करण्यासाठी काय करायला हवे याची माहिती घ्यायची आणि दररोज न चुकता प्रगती कराय्ची.
पण ध्येय साध्य झाल्यावर आपली पाठ थोपटुन नाही घ्यायची.पुन्हा मागे नाही वळायचे.


तर मंडळी कधी धावयची आपली आपली मॅरॅथॉन????

Monday 28 January 2008

जानेवारी.....

जानेवारीच्या सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर ईपिंगहम रोडवरच्या तपकिरी घरांआडुन सुर्य हसतांना दिसतो... बाजुच्या A1 वर गाड्यांनी रोजची गती पकडलेली असते. या आधी दोन महिने याच वेळी तीथे फ़क्त काही प्रकाशाचे कवडसे ढगाआडुनच वर्दी देत असायचेत... "अजुन स्वारी लोळतेय" अस सांगत...
सकाळी घराबाहेर पडतांना गारव्याने गारठलेल्या हातांनी गाडीच्या काचेवर साठलेल्या,कौलांवर भुरभुरलेल्या,गवताला ताठरवुन गोठवणा-या शुभ्र रांगोळीला पुन्हा पुन्हा मी उचलुन घेते.....
अंधा-या रात्रीचे स्वप्न सकाळी गायब होते तसे ते हाततले शुभ्र कण हळु हळु माझ्या डोळ्यादेखत आकारहीन होतात अन हातातुन घरंगळुन जातात अगदी आपल्या अधु-या स्वप्नांसारखेच....

कधी दिवसही रात्रीला कवटाळुन असतो. धुक्यात उगवतो.. मस्त असते हे धुके.. ,जगाचे अस्तीत्वच पुसायला निघालेले...!!!
..पेन्सिलीने काढलेले चित्र अर्धवट खोडल्यावर जसे दिसते.. अगदी तसेच वाटते आस पास्,
त्या चित्रात बसुन आजुबाजुच्या ..विरघळ्णा-या सृष्टीत दाखल व्हावे आणि संकोचाचे धुके बाजुला करुन मनसोक्त मनकवड्या जगात मनकवडे होवुन जावे... !
हात उंच करुन बोटे पसरुन आळस झाडत उभी असलेली झाडी,वळणा वळणावर.. लुप्त होणारा ओला fresh चकचकीत रस्ता,थंडीने आखडुन शेकोटीला बसल्या सारखी बैठी घरे.. शाळेत जाणारे, लोकरीच्या गुड्यांत गुंडाळलेले गोबरे गाल अन चमचमते इवले इवले आनंदी डोळे.. सकाळचा सगळा हा "freshness" नजर फ़िरवता फ़िरवता मी गोळा करत जाते........
रस्ता ओलांडुन मी टीनवेल कडे वळते... तीथे रस्त्यावरची मोठीच्या मोठी ओक,चेस्ट्नट आणि एल्म्ची झाडी नुसतीच उभी असतात. रिकामटेकड्या खेड्यातल्या म्हता-यासार्खी.... रस्त्यवरची गम्मत बघत.. मी त्यांची गम्मत बघत.. रस्त्यावरुन चक्कर मारते.. जाड्या, बारक्या,काटकुळ्या प्रत्येक फ़ांदीवर स्व्तंत्रपणे कोंब यायला सुरवात झालेली...प्रत्येक कोंब हेsss.. मोठाच्या मोठा.. अगदी लीलीच्या कळीसारखा..! पण ही गर्भावस्था सोडुन यायला बराच वेळ आहे. त्याधी फ़ेब्रुवारी आणि मार्च जायचाय. प्रत्येक झाड हे गर्भरपण आनंदाने मिरवत उभे... अगदी झुडुप सुध्दा....ही बाळं अंगाखांद्यावर सांभाळतांना ह्याच सगळ्यांची नंतर धांदल उडणार असते.

टिनवेल संपले की लगेच थोड्या अंतरावर केट्न..... सुरेख सुरेख सुरेख.. लाइम स्टोन्ची घरे, चर्च... पब.,त्यांच्यामधुन खिदळणारा झरा.. वर round bridge उंच उंच सायकामोर,पाइन.. आज माझा पाडाव इथेच... दिवसभर! माझी गाडी रस्त्याच्या कडेला लावुन मी माझे painting चे सामान बाहेर काढते. खुर्ची टाकते, समोर छोटा टीपोय टाकुन बस्तान बसवते. मग कॆनव्हास वर समोरचे चर्च.. वळणारे फ़ेन्स.. झाडीतले पाणी.. पबची फ़ुलांची bucket (हिवाळा अस्ल्याने त्यात ह्ल्ली नकली फ़ुले आहेत.. हीच फ़ुले समर मर्ध्ये जेव्हा जिवंत होतात तेव्हा.. अहा हा.....) अस काही बाही जे आवडेल ते सगळं.. आकार घेत रहातं.. मधुनच मी पब मध्ये जाउन चक्कर मारुन येते.. जुने.. लाकडी पब, सुबक देखण्या खानदानी आजीबाईसारखे..!!!
ही समोर दिसणारी चढण चढुन गेले की.. एक आज्जीबाईंचे farm आहे.. घर जरा आत आहे,.. शेवटी सगळ्यात पण तीकडे जायचे खास कारण म्हणजे या आजी.. दाराबाहेर घरी बनवलेले oarange मार्मालेड,srawberry jam,apple pie,cherry pie,दार्रातले पीच... आणि काय काय अजुन.. ह.. गावठी अंडी अस ठेवतात. मग तीथल्या डब्यात पैसे टाकुन मी एक मारमालेड आणि एक अंड्याचा पॆक उचलते.. उद्याच्या brekfast.. ची चव आताच जीभेवर जाणवायला लागते.. ,रस्त्यावर कुणीतरी आजी नाहीतर आजोबा भेटतात.जुन्या आठवणींचे अल्बम त्यांच्या नजरेने मला दाखवुन मार्गाला लागतात. ब-याचदा ते तीथेच लहानाचे मोठे झालेले..,जवळ पासच्या शाळेत तेव्हा पायी पायी या fence वरुन उड्या मारत गेलेले.. गायी, मेंडःया कोंडण्यासाठी, नाहितर बार्ली कापणीसाठी आई वडीलांना मदत करत आपल्या बदकाच्या ,कोंबडीच्या नाहितर टर्कीच्या मागे पळालेले असतात, याच हिरवळीत हुंदडत .मेंढ्यांची छेड काढत.... वेलिग्टन बूट्स घालुन आपल्या आई पप्पांसोबत चिखल तुडवत sunday lunch नंतर walking केलेले असते. तीथेच कुणाशीतरी सुर जुळलेले.. त्या समोर दिसणा-या पब मध्येच गाठी भेटी घडलेल्या... आता तो/ती अद्नाताच्या प्रवासाला निघुन गेले..आणि मुले कुठेतरी जर्मनीला.. औस्ट्रेलीयाला, नाहितर लंडन ला... एकटे ..पुर्ण एकटे आयुष्य.. बागकाम,चर्चचे काम , painTing नाहितर अजुन काही छंद..हाच विरंगुळा...
दुपार होता होता मी पण भरुन आलेली पाठ ताठ करते, ब्रशचे काही शेवटचे फ़टकारे मारते.
पब मध्ये जाउन गरम गरम soup of the day पोटात टाकल्यावर भेटलेल्या आयुष्याचे काही रंग, त्या दिवसाकडुन मला मिळालेले आठवणींचे रंग.. कॆन्व्हास वर उमटलेले रंग आणि त्यांचे आकार असं सगळा जामानिमा गोळा करत मी जेव्हा तीथुन घराकडे निघते तेव्हा चार वाजता..उन्ह एका दिशेला गोळा होवु लागलेली असतात....
जानेवारीतला दिवस.... रात्रीकडुन दिवसाकडे नेणा-या मधल्या पहाटेसारखा असतो.. तितकाच fresh,नवी सुरवात करणारा...हिवाळ्याच्या अंधा-या जगातुन समरच्या लख्ख उजेडाकडे नेणारा...

जुने दिवस सरले
लिहुन काही भाळी
आता नवी पहाट व्हावी
फ़िरुनी उरात भरुन घ्यावी
नवी धुमारी आशेची
स्वप्नांच्या बिल्लोरी काचेची....!!!

Wednesday 2 January 2008

पदन्यास..

असा दरवळु नको आस पास
व्याकुळ होतो बघ श्वास श्वास
लागती वेध मिटल्या क्षणांना
मग उमलावयाची आस आस..

असा आवळु नको नजरेचा फ़ास
शिशिर होतो मग वसंत मास
मन छेद देते सार्‍या नियमाना
कुठला परिघ कुठला व्यास..

असा हळहळु नको, इतका ss ध्यास
जखमांची मांडु नये आरास
काळजातल्या लखलखत्या वीजांना
होते उगीच पेटाया निमीत्त खास...

असा कुरवाळु नको प्रत्येक भास
होउदे एकदा जिवंत त्यास त्यास
तेव्हा बघ करतांना त्या क्षणांना
दिपतील नजरा असा पदन्यास..