Sunday 13 June 2010

पाऊस

पाऊस मनातला,
पाऊस वनातला..
झिम्माड झाडीतला, गच्च हिरव्या पंखांनी उडणारा...

पाऊस दृष्टीतला...
पाऊस सृष्टीतला,
पिरपिरणारा,किरकिरणारा, आठवणींच्या गर्दीतला..

पाऊस वसुधेचे प्रणयगान,
पाऊस सरितेचे प्रेरणास्थान...
उधाणणारा,बेभान सारा, अंगी रुणझुणणारा...

पाऊस नभाच्या खाणीतला..
पाऊस सप्तरंगी थेंबातला,
ऐटीत बरसणारा,जणु अधिकारी वर्दीतला...

पाऊस क्षणाचा गारवा..
पाऊस भरल्या डोळ्यांचा पारवा..
उध्वस्त नजरेचा,दडलेल्या हुंदक्याचा आसरा..

पाऊस उनाड पोर...
पाऊस रंगीबेरंगी मोर,
नाचरा, भिरभिरा, लहान थोर सा-यांच्या मर्जीतला...

पाऊस आसुसलेला,
पाऊस कासाविसलेला..
डोळ्यातुन टपटपणारा,कवितेत रेंगाळणारा....

पाऊस त्रेधातिरपीट...
पाऊस उन्हाची उघडीप,
अल्लड्,निरागस, लुकलुकु बघणा-या बाळाच्या सर्दीतला..

पाऊस तारेवरचा मोती,
पाऊस धन धान्याची पोती,
धुवाधार कोसळणारा,उन्हाचे उखाणे सोडवणारा...