Thursday 4 December 2008

उत्सव

चेह-यावर तुझ्या पाहिला...
काल भावनांचा उत्सव जाहला

उमलुन रात्र आली
अलवार श्वास झाला..
झरत गेले चांदणे आरपार
दिशा पांघरुन आनंद शहारला
चेह-यावर तुझ्या पाहिला....

असे कढ ओसरले की
खुळ्यागत दिन गहिवरला
दृष्टीत वस्तीस घन निळा आला
त्या निळाईची शपथ तुला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

धीर अधीर झाला
कायेस मधुर सुर आला..
क्षण तो सारा, ऋतु बदलाचा
हिरवा पिसारा देउन गेला
चेह-यावर तुझ्या पाहिला...

असा साक्षात समोर दिसलास तु
जसा कण कण माझा हरवलेला
निवळत गेला रंग उन्हाचा
अन मनात समीर सरसरला

चेह-यावर तुझ्या पाहिला
काल भावनांचा उत्सव जाहला......

Wednesday 3 December 2008

मौन

तुझ्या मौनाचा अखंड अविरत झरा
अंधारावर क्षुब्ध शांततेचा चरा,

वेढुनी दु:ख आसवांनी आता गीत गावे
किती दिवस असं उगा हसु सहावे,

मिसळुनी भावना अंधा्रात कित्येक रात्री सरल्या..
दिवसाच्या चेह-यावर त्या निर्विकार ठरल्या,

प्रत्येक क्षण मलुल हुंदका सुनविती आज
नुरली ना कुठे का चैत्यन्याची गाज...,

पुन्हा प्रारंभ नवा, का अंत व्हावा..
संपावे हे आडाखे..उत्तरासाठी आता कधी न प्रश्न पडावा....!!!!

Tuesday 2 December 2008

भरती

ती कशी घन गंभीर, बंदिस्त
सागरासारखी खोल... खोल
आत सुध्दा शांत अन फ़क्त शांत
असं तीला वाटायचे...
सगळीजणही हेच म्हणत....
पण एके दिवशी तो म्हणाला..
तु कशी ना खळाळती,
किना-याबाहेर धावणा-या लाटेसारखी
अतर्बाह्य भिजवणारी...

त्या दिवशी तीला पहिल्यांदा
"भरतीचा" अर्थ कळला...